इंदापूर : इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे अनैतिक संबंधांच्या संशयातून २९ वर्षीय तरुणाची लाकडी दांडक्याने आणि दगडाने मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी (दि. २९ ऑक्टोबर) दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास केतकेश्वर विद्यालयाजवळ पालखी महामार्गावर ही घटना घडली. पुष्पराज मुरलीधर गायकवाड (वय २९, रा. सणसर, ता. इंदापूर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी मृत पुष्पराज यांची आई सुलोचना मुरलीधर गायकवाड (वय ४७, रा. सणसर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार स्वप्नील भीमराव बारवकर आणि अशुतोष संजय भोंग (दोघेही रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३(१), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनैतिक संबंधांच्या संशयातून मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पुष्पराज गायकवाड याचे निमगाव केतकी येथील तलाठी भाऊसाहेब बारवकर यांच्या पत्नी तेजस्विनी बारवकर यांच्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपींना होता. याच संशयातून आरोपींनी पुष्पराज याला लाकडी दांडक्याने तसेच दगडाने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने पुष्पराज याचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेमुळे सणसर आणि निमगाव केतकी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे पुढील तपास करीत आहेत. तर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पी.एस.आय. स्वाती सुरवसे यांनी केली आहे.

0 Comments